Tuesday, October 2, 2012

'द मॅन विथ द क्लबफुट' - लेखक डग्लस वॅलेंटाईन



पुस्तक नावाचा ऐवज रंगवत न्यायला काय पाहिजे? तर एक म्हणजे 'कथानक' ही गोष्ट मुळात हवी - आणि दुसरे म्हणजे
ती रंगवणारा, रंगवत रंगवत त्यात गुंतणारा, आपल्या कथेबद्दल आत्यंतिक जिव्हाळा असणारा लेखक... जर या दोन
चिजा असतील त्याने बेलाशक पांढऱ्यावर काळे करावे - वाचक आपोआप या समीकरणात जमा झालेच म्हणून समजा...
      एवढे पाल्हाळ लावायचे कारण सध्या वाचत असलेले पुस्तक -
'द मॅन विथ द क्लबफुट' - ही हेरकथा - पहिल्या महायुध्धाची
पार्श्वभूमी असणारी... आणि अतिशय रंजक - उघडच आहे लेखकाजवळचे गोष्ट रंगवून सांगण्याचे अफलातून कसब...


      डेसमंड ओकवूड हा नायक - ब्रिटीश हेरखात्यातला त्याचा भाऊ बेपत्ता होतो - एका गुप्त संदेशाद्वारे
डेसमंडला कळते की तो
जर्मनीत अडकला आहे - म्हणून नाना क्लुप्त्या लढवून
डेसमंड जर्मनीत - बर्लिनला येतो - आणि त्याची गाठ पडते ती जर्मन हेरखात्यातील
Doktor Grundt बरोबर - या डॉक्टरचा एक पाय कृत्रिम - लाकडाचा - म्हणून तो 'क्लबफुट'...
     
'क्लबफुट' खूपच चतुर - अत्यंत निष्णात - आणि निर्दयी - पण आपला नायक त्याच्यावर हरप्रकारे मात करतो या वळणाने कथानक
पुढे सरकते - सरकते म्हणजे काय अगदी सुसाट धावते - बरीच अविश्वसनीय वळणे घेत पुढेपुढे जाते - वाचकाला पार १९१८ मध्ये नेते
- डेसमंडला कैसरसमोर नेतात तो प्रसंग तर केवळ लाजवाब - डेसमंड तिथून सुटतो तेव्हा आपण निश्वास टाकतो - इतकी अफलातून
वातावरण निर्मिती...

      चित्त थरारून टाकणारे असे काही प्रत्येकाला (कल्पित असले तरीही) लागते हे खरेच...
रेव पार्ट्या करणारे अशी पुस्तके का ट्राय करत नाही कोण जाणे ;-)
 
ता. क. १ -  हेरकथांचा विषय निघालाच आहे तर मॅनिंग कोल्स यांच्या 'ड्रिंक टू यसस्टर्डे' आणि 'अ टोस्ट टू टुमारो' यांच्याबद्दल लिहायलाच हवे -
त्याबद्दल पुढे लवकरच...
 ता. क. २ - प्रकाशक हर्बर्ट जेनकिन्स यांच्याबद्दल जरूर जरूर लिहायला पाहिजे - पी.जी. वूडहाउस यांचे ते खास प्रकाशक - म्हणून
त्यांच्याबद्दल खास ममत्व आहेच -आणि स्वत:
जेनकिन्स हे अत्युत्तम विनोदी लेखक होते - जोसेफ बिन्डलेला कोण विसरू शकेल? - जेनकिन्स यांच्याबद्दल स्वतंत्रपणे लवकरच)  
 
 
 

Monday, October 1, 2012

'द हाय विंडो' - द डायलॉग सिम्पली crackles

फिलीप मार्लेव हा चॅंडलर यांचा नायक - मिसेस मर्डोक यांची एक
रेअर कॉईन चोरीला जाते - त्याचा तपास लावण्यासाठी मार्लेवला
बोलवण्यात येते... जसा तपास पुढे सरकतो तशी अतर्क्य घटनांची
एक मालिका सुरु होते...
न केलेल्या गुन्ह्याचा सल जवळपास आठ वर्षे बाळगणारी मेरील - तिला
छळणारी ती हाय विंडो - त्यातून पडून मरणारा माणूस -

 आणि
तिच्या गिल्ट कॉम्प्लेक्सचा अतिशय खुबीने केलेला वापर - अंगावर काटा आणतो...
चॅंडलर यांची भाषा तर केवळ अप्रतिम - अति उच्चभ्रू क्लब मध्ये मार्लेव रात्री जातो -

'Around the curve the whole valley spread out before me. A thousand white
houses built up and down the hills, ten thousand lighted windows and the stars
hanging down over them politely, not getting too close, on account of the patrol.'